मुंबई -
मराठी तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष योगेश सावंत यांच्यासह एकूण तिघांना भांडुप पोलिसांनी अटक केली. मारहाण झालेल्या तरूणाचे नाव नवल बारकुंड(३१) असे असून तो भांडुपच्या स्कोडा सर्व्हिस सेंटरचा व्यवस्थापक आहे.
भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मे रोजी ही घटना घडली. सर्व्हिस सेंटरमध्ये अक्षय बावकर नावाचा तरूण टेक्निशीअन म्हणून काम करत होता. गैरहजर राहाणे, सदोष कामाच्या तक्रारीवरून बारकुंड यांनी अक्षयला दम दिला. काम जमत नसेल तर नोकरी सोड, असे सांगितले. तेव्हा बारकुंड यांची तक्रार अक्षयने आपल्या एका नातेवाईकाकरवी विभागअध्यक्ष सावंत यांच्याकडे केली. सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते सर्व्हिस सेंटरमध्ये बारकुंड यांना जाब विचारण्यासाठी गेले. तेथे सावंत यांनी बारकुंड यांना मारहाण केली.
सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते थेट माझ्या केबीनमध्ये शिरले आणि शिवीगाळ करू लागले. मी प्रतिकार केला असता त्यांनी मला मारहाण केली, असे बारकुंड यांनी सांगितले.
सावंत यांच्या दाव्यानुसार काकांची तब्येत अत्यवस्थ असल्याने अक्षय न सांगताच सुटीवर गेला होता. त्याचा राग ठेवून बारकुंड यांनी त्याला संपूर्ण दिवस आपल्या केबीनमध्ये उभे ठेवले. तसेच राजीनामा देण्यासाठी दबाव आणला. त्याबददल चर्चा करण्यासाठी मी तेथे गेलो होतो. मात्र बारकुंड यांनी अक्षयबाबत वैयक्तिक पातळीवर संतापजनक भाष्य केले. तसेच संपूर्ण चर्चेत ते उद्धटपणे वागले.
दरम्यान, या घटनेनंतर बारकुंड यांच्या तक्रारीनुसार भांडुप पोलिसांनी सावंत, अक्षय, अन्य कार्यकर्त्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणात सावंत, बावकर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने जामीनावर सोडल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रशांत मर्दे यांनी दिली.