मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून रिंगणात असतील. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकताना शाब्दिक टोलेबाजी केली.
माहीम मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना अमित ठाकरे यांनी समुद्रकिनारी स्वच्छता कशी ठेवला येईल यासाठी काम करू असे सांगितले. तसेच राज ठाकरे ठामपणाची भूमिका घेत असतात. ते याकडे उपकार म्हणून पाहत नाहीत. त्यांची ती भूमिका असते. त्यामुळे समोरच्यांनी याची परतफेड करावी अशी त्यांची कधीच इच्छा नसते. समोरची मंडळी कशी आहे हे आपण ओळखायला हवे असे ते सांगतात. लोकसभेवेळी राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला. नारायण राणेंसह महायुतीतील काही उमेदवारांसाठी सभा घेतल्या. म्हणून त्यांनी परतफेड करावीच अशी आमची इच्छा आणि सवयही नाही, असे अमित ठाकरे यांनी त्यासंदर्भातील प्रश्नावर म्हटले.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्याविरोधात कोणीही उभे राहिले तरी याचा काहीही फरक पडत नाही. मी स्वत: राज ठाकरेंना सांगितले आहे की, मी एकटा उभा राहून काय फायदा आहे, माझ्यासाठी कोणत्या इतर जागांचा त्याग नको. यावरुन आमच्या स्वबळाची भूमिका स्पष्ट होते. माझ्या एका जागेसाठी दहा जागांचा त्याग नको असे मीच सांगितले. वरळीमध्ये मागील निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नाही हे राज ठाकरे यांचे संस्कार आहेत.
"माहीम विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे माझ्या तोंडपाठ आहेत. माझी उमेदवारी पक्षाने जाहीर करण्याआधी माध्यमांकडूनच समजली. प्रभादेवीपासून ते माहीम चर्चपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मतदारसंघाला लाभलेला समुद्रकिनारा लोकांना अपेक्षित नाही असा स्वच्छ करुन दाखवू हा माझा प्रयत्न असेल. माहीमचा आमदार झाल्यावर या मतदारसंघासाठी काही दिवस राखून ठेवेन. पक्षाला गरज होती म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घेतले. सरदेसाई यांचे माझ्या उमेदवारीला समर्थन आहे. २३ नोव्हेंबरनंतर आम्ही सत्तेत असू त्यामुळे माहीमसह इतर मतदारसंघातीलही प्रश्न सुटतील. २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झाला आहे तो आम्हाला पुढे पोहोचवायचा नाही. यामुळे राजकारणात येणारा तरुण याकडे वळणार नाही", असेही अमित यांनी नमूद केले.