Raj Thackeray News: लोकसभेच्या निकालावरून महाविकास आघाडीच्या लोकांना असे वाटत आहे की, आम्हाला मतदान झाले. परंतु, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हे समजून घ्यायला हवे की, ते झालेले मतदान हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात झालेले मतदान होते. यांच्या प्रेमाखातर मिळालेली मते नव्हती. मी नेहमी सांगत आलो आहे की, विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पराभूत होत असतात. आता त्यांना असे वाटते आहे की, येणाऱ्या विधानसभेलाही त्याच प्रकारची खेळी खेळावी, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आणि स्पष्ट शब्दांत तोफ डागली.
मीडियाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खेळी सुरू आहे, हे राज्यातील मराठा बांधव, ओबीसी बांधव यांनी समजून घ्यायला हवे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. तसेच पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेषतः मराठवाड्यात जेवढ्या दंगली घडवता येतील, असे प्रकार घडवता येतील, यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. जातीबाबतचे प्रेम हे केवळ राज्यात नाही, तर संपूर्ण देशातील समाजांमध्ये आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा राग समाजावर का काढता
दुसऱ्यांच्या जातीबाबत द्वेष पसरवण्याचे काम शरद पवार यांनी केले. समाजात तेढ निर्माण करून आणि विष कालवून यांना कोणते राजकारण करायचे आहे. या लोकांच्या राजकारणाचा बेस हाच आहे. आमचे एवढे खासदार निवडून आले, असे यांना वाटत असेल, परंतु, त्यांच्या खासदारकीवर जाऊ नये. यांचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणे लावत आहात. देवेंद्र फडणवीस यांचा राग समाजावर का काढता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
दरम्यान, अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. तसेच तीन लोकांची एक कंपनी आहे. त्यांचेच स्टेक ठरलेले नाहीत, तर आणखी पार्टनर कुठून घेणार, असा टोला राज ठाकरे यांनी महायुतीबाबत बोलताना लगावला.