उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राज्यात देखील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमीवर राममंदिराचा शिलान्यास होणार आहे. बलिदान झालेल्या, लढलेल्या असंख्य कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा, पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये, असं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलं आहे. राज ठाकरेंनी आज पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
२२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येत येण्याची तयारी करू नका. घरी राहूनच सर्वांनी श्रीरामज्योती प्रज्वलित करा, दिवाळीसारखा सण साजरा करा आणि असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतील मंदिरे व महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या.
देशभरातील मंदिरात स्वच्छता कार्यक्रम
२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लोकांनी त्यांच्या सोयीनुसार येथे येण्याचे नियोजन करावे. लगेच येण्याची घाई करू नये. या क्षणाची आपण ५०० वर्षे वाट पाहिली, तर आणखी काही दिवस वाट पाहण्यात काहीही नुकसान होणार नाही. १४ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तीर्थक्षेत्र आणि देशातील प्रत्येक मंदिरात स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात यावेत.