मुंबईः नोटाबंदीच्या काळात सर्वाधिक पैसे ज्यांच्या बँकेत जमा झाले त्या अमित शहांवर कुठली कारवाई होत नाही, चंदा कोचर अजूनही बाहेरच आहेत, पीएनबीचं पुढे काय झालं माहीत नाही, पण बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना थेट अटक केली जाते. त्यांच्यावरील या कारवाईचा संबंध डीएसके प्रकरणाशी नाही, तर शेतकरी कर्जाशी आहे, असा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलं.
शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. रवींद्र मराठे हे त्या समितीचे सदस्य होते. त्यांनी आपल्या अहवालात सरकारवर ताशेरे ओढले होते. सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय, कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही, असा अभिप्राय मराठेंनी नोंदवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री चिडले होते आणि नंतरच त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे, असं सूचक विधान करत राज यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्यासह बँकेच्या सहा आजी-माजी अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. या कारवाईबाबत आपल्याला माहीत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यावरून राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. बँकेच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला अटक करायची असेल तर रिझर्व्ह बँकेशी किंवा वित्त मंत्रालयाशी बोलावं लागतं. त्यामुळे मला काहीच माहीत नाही, हा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा आहे, असं राज म्हणाले. सरकारच्या पायाखालची जमीन सरकरल्यानेच ते अशा कारवाया करताहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.