मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या नव्या झेंड्याची चर्चा सुरू होती. मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेवरुन वादही झाला. मनसेचा भगव्या झेंडा समोर आल्यानंतर आता पक्ष हिंदुत्त्वाच्या दिशेनं जाणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावर भाष्य करताना भगवा हाच माझा डीएनए आहे. मी अनेकदा मराठीसाठी आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेतलेली आहे. तुम्ही हिंदुत्वाकडे जात आहात का, असा प्रश्न विचारणारे तेव्हा कुठे होते, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते.माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केल्यास मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि कोणी माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केल्यास मी हिंदू म्हणून त्याचा समाचार घेईन, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'आझाद मैदान परिसरात रझा अकादमीनं हैदोस घातला. पोलिसांवर हात टाकण्यात आले, तेव्हा त्यांच्याविरोधात कोण रस्त्यावर उतरलं होतं ते लक्षात असू द्या. पाकिस्तानी कलाकारांविरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात भूमिका घेणारी मनसेच होती. दहीहंडीच्या थरांवर निर्बंध आणले गेले, त्यावेळी मीच आवाज उठवला होता,' याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. पक्षाचा झेंडा बदलल्यावर अनेकांना प्रश्न पडले. पण मी काही धर्मांतर केलेलं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, अशा शब्दांत राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी त्यांनी धर्माबद्दलची भूमिका स्पष्ट केली. धर्म प्रत्येकानं आपल्या घरात ठेवावा. मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत हे मी फार आधीच म्हटलं होतं. आमची आरती त्रास देत नाही. मग तुमचा नमाज का त्रास देतो? नमाजाला भोंगे कशाला हवेत?, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंचा एका ओळीत समाचार; महाविकास आघाडीवरुन 'राज'गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:46 PM