वसई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसईतल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या पातळीत टीका केली. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो. नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जावून भारतीय डॉक्टरांचा अपमान केला. मी पाहिलेले मोदी आजचे नाहीत, एवढा माणूसघाणा पंतप्रधान मी पाहिला नाही, अशी टीका राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असून, फडणवीस हे रामदास पाध्ये यांचं बाहुलं असल्याचाही उपरोधिक टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. तसेच बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वेसाठी जमिनी देऊ नका, जबरदस्ती केली तर रूळही उखडून टाका, असा आदेशही त्यांनी जनतेसह मनसैनिकांना दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 2 मे रोजी ते वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदी भागांना भेटी देऊन स्थानिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या धडाक्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी माहिती मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिली होती. सभेचा आराखडा पूर्ण झाला असून बैठक व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. या सभेचे निवेदन पालघर पोलिसांना दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजय दाभोळकर यांनी लोकमतला दिली आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे - बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वे साठी जमिनी देऊ नका, जबरदस्ती केली तर रूळही उखडून टाका- बाहेरून आलेल्या लोकांनी इथं शहाण्यासारखच राहावं, नाही तर मी हे बोलतच राहणार आणि असंच काम करत राहणार- स्थानिक लोकांना माहिती नाही, मात्र दूरच्या लोकांना कळतं. बुलेट ट्रेनच्या मार्गावरच्या जमिनीही हेच लोक घेताहेत- नाणारमधल्या जमिनी या गुजराती लोकांनी का घेतल्या?- पालघर जिल्ह्यातही झोपडया वाढताहेत. जनतेची कुणालाच काळजी नाही. यांचा संबंध फक्त मत मागण्यापुरताच- हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊ बघा- अडचणीत आल्यानेच भाजपला हिंदुत्वाची आठवण- नोटाटंचाई आहे मग भाजपकडे निवडणूक लढायला पैसे कुठून आले ?- मराठी मुसलमान राहतो, तिथे दंगली होत नाहीत- एटीएममध्ये नोटा संपल्यात, भारत सरकार सांगतंय नोटा छापण्यासाठी शाई संपलीये, हे काय वाण्याचं दुकान आहे का ?- नोटा छापायच्याच होत्या, तर कॅशलेस इंडिया हे काय प्रकरण आहे?- मी पाहिलेले मोदी आजचे नाहीत, एवढा माणूसघाणा पंतप्रधान मी पाहिला नाही- नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणारा या देशातील पहिला माणूस मी होतो- नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जावून भारतीय डॉक्टरांचा अपमान केला- महाराष्ट्राचं वाळवंटीकरण होत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायेत, एक लाख विहिरी बांधल्या- महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला ही घोषणा खोटी. पाणीच नाही तर संडास बांधून फायदा काय ?- मोदी म्हणतात, आमच्यामुळे वीज आली, मग 2014 आधी आम्ही अंधारात होतो का?- गुजरातच्या लोकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे- बुलेट ट्रेन पाहिजे कशाला?- मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान- फडणवीस म्हणजे रामदास पाध्ये यांचं बाहुलं- देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री- मोदी गुजरातचेच पंतप्रधान, भारताचे नाहीत- आरक्षणाच्या नावावर भांडत असताना, बाहेरून आलेल्यांमुळं निर्माण झालेलं संकट आपण विसरलोय- खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के. या पाच टक्क्यांसाठी आपण भांडतोय- मराठी शाळा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला, काय सरकार आहे- ज्या महाराजांनी अवघा महाराष्ट्र एक केला, तोच महाराष्ट्र आज विभागलाय.- महाराष्ट्र दौरा हा पक्षबांधणीसाठी, फक्त पालघरमध्येच सभा असेल, इतर ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटणार- आरक्षण मुळात लागतं कशाला? फक्त शिक्षणात आणि सरकारी नोकरीत- ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र पिंजून काढणार- आपल्याकडे विषयाला कमी नाही, सर्वांचा समाचार घेणार- महाराष्ट्राची आजची अवस्था मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे - महाराष्ट्राला काय तेजस्वी इतिहास आहे.- आज ट्विटरवर जुना व्हिडीओ पाहिला, अंगावर रोमांच उभं राहिलं.- आज जातीपातीत महाराष्ट्राला विभागलाय