मुंबई - राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या २ वर्षापासून कोविडमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यात राज्यातील सत्तांतरामुळे येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पणाला लागलं आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काही महिन्यांपासून विविध बैठका, गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती करत आहेत. विदर्भ दौऱ्यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात खंड पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे दौऱ्यावर निघाले आहेत. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
याबाबत स्वत: राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले की, २७ नोव्हेंबरला मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडेल. त्यानंतर २८ किंवा २९ नोव्हेंबरला मी कोकणच्या दौऱ्यावर निघणार आहे. सुरुवातीला मी कोल्हापूरला जाणार आहे. त्याठिकाणी देवीचं दर्शन घेऊन पुढील कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. मनसेच्या सलग्न संघटनांतील समस्या, अडचणी दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
...मग राज ठाकरे संकुचित कसा?माझं पहिल्यापासून मत असेच होते की, पंतप्रधान हे देशाचे आहेत. सर्व राज्यांसाठी त्यांची भूमिका असायला हवी. महाराष्ट्रातून हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसते वाटले. परंतु जो प्रकल्प राज्याबाहेर जातोय तो गुजरातलाच जातोय याचे वाईट वाटते. राज ठाकरे महाराष्ट्राबद्दल बोलतो मग तो संकुचित कसा? प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या स्थानिकांना रोजगार मिळायला हवा. प्रत्येक राज्यात उद्योग गेले तर देशाचा विकास होईल. आजही महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये इतर राज्यांपेक्षा पुढे आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र राज्य प्रथम पसंतीचं वाटतं असं राज ठाकरेंनी म्हटलं.
मनसे-भाजपा-शिंदे गट युती होणार?दीपोत्सवाचं उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं त्यात गैर काय आहे? एखाद्या अभिनेत्याला बोलावलं तर मी चित्रपटात जाणार असं होते का? असं सांगत राज ठाकरेंनी पत्रकारांनी विचारलेल्या युतीच्या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली आहे त्याचसोबत सध्या जे राजकारण सुरू आहे ते खालच्या पातळीवरचं आहे. असे राजकारण महाराष्ट्रात याआधी पाहिले नव्हते. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"