पिंपरी – राज ठाकरे असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावात दरारा आणि दहशत दोन्ही आहे. राज ठाकरेंचे सडेतोड भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं जमतात. राज ठाकरेंबाबत अनेक सेलिब्रिटी मित्र म्हणतात हा दिलदार मनाचा माणूस आहे. त्याचाच प्रत्यत पिंपरी चिंचवडकरांना आला. अलीकडेच राज ठाकरे पिंपरीच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांचा गराडा राज ठाकरेंच्या भोवती कायम असतो. त्यात राज ठाकरेही बऱ्याचदा कार्यकर्त्यांसाठी हळवे होताना दिसतात.
पिंपरी चिंचवड येथील दापोडीच्या एका कॉलनीत राहणारा सर्वसामान्य असा विशाल देशपांडे, मनसेच्या स्थापनेपासून हा कट्टर कार्यकर्ता, पूर्वी किर्लोस्कर ऑईलमध्ये नोकरी करायचा. परंतु परिस्थितीने नोकरी गेली आणि तो रिक्षा चालवू लागला. त्यात वडिलांचे आजारपण वाढले आणि त्यामुळे विशालची परिस्थिती आणखी खालावली. समाजकार्याची आवड असूनही घरच्या जबाबदारीने तो खचला. मनसेतील त्याच्या सहकाऱ्यांनी अनेकदा मदतीचा हात दिला. परंतु संकटे आली तर एकामागोएक येत असतात. विशाल देशपांडेच्या मुलाला एका दुर्धर आजाराने गाठले.
विशेष म्हणजे विशालचे राज ठाकरेंवर इतके प्रेम की त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही राज ठेवले. शाळेत शिकणाऱ्या राज देशपांडेचा आजार बळावत गेला. शरीरातील हाडे कमजोर होत जाणारा मस्कुलर डिस्लोकेट असा हा आजार आहे. या उपचारासाठी कोट्यवधीचा खर्च लागणार आहे. मात्र अशावेळीही राज देशपांडेंनी वडिलांकडे हट्ट धरत राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. विशाल देशपांडेही हे पिंपरीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले. याबाबत राज ठाकरेंकडे निरोप पोहचला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता राज यांनीही भेटण्यास होकार दिला. बुधवारी सकाळी राज ठाकरे स्वत: देशपांडे यांच्या घरी पोहचले.
जाता जाता राज ठाकरेंनी मुलासाठी स्वत: खेळणी खरेदी केलेली खेळणी भेट म्हणून दिली. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. राज ठाकरेंनी राजच्या सफेद कुर्त्यांवर प्रिय राज असं लिहून त्यावर राज ठाकरे अशी स्वाक्षरी केली. स्वत: राज यांनी गल्लीबोळातून वाट काढत विशाल देशपांडेच्या घरी जाऊन चिमुकल्या राजची भेट घेतली. या घटनेने कुटुंबाला मोठा आनंद झाला. ज्या राजसाहेबांना आम्ही आमचा विठ्ठल मानलं, या विठ्ठलाचे पाय माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या घरी लागले. आज विठ्ठल आम्हाला भेटला अशा शब्दात विशाल देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.