कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आणि अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. महाराष्ट्रातूनही अनेक मजून आतापर्यंत आपापल्या राज्यात परतले आहेत. पण, या मजूरांवरून आता राजकारण तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक फतवा काढला आणि त्यांच्या या फतव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्थलांतरित मजुरांना राज्यस्तरावर विमा देण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचसोबत अशाप्रकारे यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्यात या कामगारांच्या सुरक्षेसाठी यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरण करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. आता ज्या राज्यांना यूपीचे मजूर पुन्हा बोलवायचे असतील तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटवरून आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलं की,'' उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.''
''तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,'' असेही आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला केलं.
त्यांनी पुढे असे म्हटले की,'' जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी.''