नागपूर - दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संबंधित आरोपींना १२ वर्षांनी फाशीची शिक्षा झाली. बलात्काराच्या खटल्यांना एवढा विलंब लागत असेल तर या गुन्ह्यांचे करायचे काय? ज्यांनी आज बंद पुकारला त्यांच्याही काळात हे घडलंय आणि आजही तेच घडतंय. वर्तमानात आज या बातम्या येतायेत. त्यामागे काही राजकारण आहे का? या गोष्टी होता कामा नये हा विषय आपल्याला महत्त्वाचा आहे. निवडणूक आल्या म्हणून या सरकारला बदनाम करा, मग तुमच्याही सरकारमध्ये ते होतेच ना..उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही त्यावेळचा आकडाही मी दिला मग त्यांचे काय करणार? असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनीमहायुती आणि महाविकास आघाडी दोघांवर निशाणा साधला.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, बदलापूरची घटना मनसेच्या महिला सेनेने त्याला वाचा फोडली. मात्र ती घटना झाल्यानंतर फटाक्यांची माळ लागल्यासारख्या इतर सर्व घटना पुढे आल्या. माझ्याकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारी आहे. महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होतेय. देशातील आर्थिक राजधानी मुंबईतही महिलांना सुरक्षित वाटत नाही. २०२३-२४ आकडेवारीनुसार महिला विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले. त्यानंतर पुणे मग नागपूरचा नंबर आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा वाढता आलेख, बलात्कार, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचार, अपहरण आणि इतर...यात २०१७ साली महाराष्ट्रात ४३२० बलात्काराचे गुन्हे, २०१८ - ४९७४ बलात्कार, २०१९ - ५४१२ बलात्कार, २०२०- ४८४६ बलात्कार, २०२१-५९५४ बलात्कार, २०२२ - ७०८४ बलात्कार आणि २०२३- ७५२१ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच महाराष्ट्रात दर तासाला १ गंभीर गुन्हा नोंदवला जातो. नोंद न झालेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. २०२२ च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत. २०१९ ते २०२१ या काळात बेपत्ता झालेल्या मुली १ लाख ८४२ प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या सुनावणीवेळी ही आकडेवारी समोर आली. बीड, सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची. कामावर सुट्टी होऊ नये म्हणून महिलांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे. बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी, अशा लोकांना ठेचलेच पाहिजे. आपल्याकडे कठोर शासन आणि कठोर कायदा होत नाही हे यामागचं कारण आहे असं राज ठाकरेंनी संतापून म्हटलं.
फोडाफोडी आणि जातीयवादाचं राजकारण शरद पवारांनी सुरू केले
फोडाफोडीचं राजकारण, जातीयवाद या सर्व गोष्टींना कारणीभूत शरद पवार आहेत. या गोष्टींची महाराष्ट्रात पहिली सुरुवात पवारांनी केली. पुलोद स्थापन झाले तेव्हापासून पाहिले तर १९७८ ला सरकार बनवणे, १९९१ साली शिवसेनेचे आमदार फोडले. गणेश नाईक, नारायण राणे गेले त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीला सुरुवात झाली. हे सगळं राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्रात सुरू केले. जातीचं विषदेखील त्यांनी कालवलं. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या अगोदरचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र तुम्ही बघा. कधी महापुरुषांची विभागणी जातीत झाली नव्हती. संताची ओळख आडनावांनी केली जात नव्हती. या सर्व गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या, असा महाराष्ट्र याआधी कधीच नव्हता असं सांगत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केले.
राज्यातील गलिच्छ राजकारणाचा लोकांना राग
महाराष्ट्रात अशाप्रकारची परिस्थिती पाहिली नव्हती. जसजशी निवडणूक जवळ येतील तसं महायुती आणि मविआत उमेदवारीसाठी हाणामाऱ्या सुरू होती. सर्व पक्ष बेजार होतील त्याची झलक लोकसभेला पाहिली पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभे राहायचे आहे याचे चित्र दिसतंय. आमच्यासाठी वातावरण खूप पोषक आहे. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जो राजकीय खेळ झाला त्याला लोक त्रस्त झाले आहेत. ज्याप्रकारे मविआला लोकसभेत मतदान झाले ते समजून घेतले तर या निवडणुकीत एकगठ्ठा मुस्लीम समुदायाने मोदी-शाहविरोधात भाजपाविरोधात मतदान केले. अबकी बार ४०० पार, संविधान बदलणार असं वातावरण भाजपाच्या नेत्यांच्या विधानामुळे तयार झाले. त्यामुळे देशातील दलित बांधवांनी भाजपाविरोधात मतदान केले. हे मतदान भाजपाविरोधी होते ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातीर झालेले मतदान नव्हते. त्यामुळे जी वाफ होती ती लोकसभेला निघाली. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण या लोकांनी केले ते लोक विसरले नाहीत. मतदारांची प्रतारणा झाली, ज्याप्रकारे महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला त्याचा राग येणाऱ्या विधानसभेत लोक नक्की काढतील असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.
जे पवारांनी केले तेच भाजपाने केले
प्रत्येकाला राजकारण करायचे म्हटल्यावर हे नाणं चालतंय तर चालवून घ्या तसं भाजपाने केले. जातीयभेद सर्वांनी मिळून हे बंद केले पाहिजे. हा विषय फक्त राजकारणापुरता, लोकसभा, विधानसभेपुरता नाही तर घराघरात शिरलेला विषय आहे. मध्यंतरी मी क्लिप पाहिली. लहान मुलींच्या व्हिडिओत आम्ही ओबीसी समाजाच्या असल्याने मराठा समाजाच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत. आमच्या घरी येणं सोडून गेले हे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हते असं राज ठाकरेंनी म्हटलं.