अतुल कुलकर्णी
काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. भावना व्यक्त करण्यासाठी, एकमेकांना ज्या गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाहीत ते सांगण्यासाठी पत्रं लिहिण्याची परंपरा मोबाईल संस्कृतीने संपवून टाकली. पत्र लिहिताना लोक कविता करायचे, शब्दांशी खेळायचे, आता ते एसएमएसशी खेळतात. सगळ्या चांगल्या गोष्टी, संस्कृती अशा मोडीत निघताना पाहून अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी थेट गणरायालाच पत्र लिहायचा निर्णय घेतला. तसं आधी त्यांनी त्यांच्या मोठ्या बंधूंना पत्र लिहिलं, पण ते पडले मुख्यमंत्री. त्यांच्या कार्यालयातून ‘‘आपले पत्र मिळाले, योग्य त्या विभागाकडे पत्र पाठवण्यात आले आहे’’ असा संदेश आल्याचे वृत्त हाती आले आहे. याआधी देखील त्यांनी अनेक नेत्यांना पत्रे लिहिली होती. आता यावेळी त्यांनी थेट गणपतीलाच पत्र लिहिलं त्याची कॉपी चुकून बाबूरावांच्या हाती लागली. ती अशी...
प्रिय गजानना, बाप्पा,मोरया... साष्टांग दंडवत !
तुझ्या राज्यात हे जे काही चालूयं ना... ते तू कसं काय खपवून घेतोस... वरती हसतमुखही असतोस... पत्राच्या नादात विसरून जाईन पुन्हा, पण ही जी कला आहे ना तुझ्याकडे तेवढी शिकवून जा... मला हल्ली पटकन् रागबिग येत असतो. बरं ते जाऊ देत. मी काय म्हणत होतो, तुझ्या आशीर्वादाने मी हाती घेतलेलं आंदोलन जोर धरत आहे. भोंग्यांचा (हिंदुत्वाचा नाही) मुद्दा मराठीपेक्षा भारी झाला आहे. हे माझ्या लक्षात आलंय. लोक विनाकारण भोंग्याचा संबंध धर्माशी जोडतात. पण तसं नाहीयं... भोंगा वाजल्याशिवाय आपल्या नावाचा डंका तरी कसा वाजणार? आता थेट तिकडे उत्तर प्रदेशात माझ्या विरुद्ध मोर्चे चालू आहेत. त्यांना आपल्या इथून फूस आहे याची खबरबात तुलाही आलीच असेल... काही असो. आपल्याला आता भोंगा सोडायचा नाहीय...
बाप्पा तुला आठवत असेलच. काही वर्षांपूर्वी मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता... त्यावेळी राज्यभर आपलीच चर्चा होत होती. त्यावेळी मी मराठीची पताका खांद्यावर घेतली होती; कारण राज्यात तुझं स्वागत मराठी पाट्यांनी करायचं, अशी माझी इच्छा होती. याला आता किती तरी वर्षे झाली. तुला सगळीकडे मराठी पाट्या दिसाव्यात, तू खुश व्हावे आणि या राज्याला संपन्न करावे, अशी मी मनोमन प्रार्थना देखील केली होती त्यावेळी... कोणी काहीही म्हणो, मी त्यांच्या बापालाही भीत नाही... आता देखील मी भोंग्यांचा मुद्दा समाजातलं प्रदूषण दूर करण्यासाठी काढला आहे. तो काही धर्माचा मुद्दा नाही. हे सांगूनही कळत नाही कोणाला... मी पण मागे हटणारा नाही... या आधी टोलचा विषय असेल किंवा मराठीचा... मी मागे हटलो नाही ना... तसाच आताही मागे हटणार नाही...
गजानना, माझी एक इच्छा आहे. आज तुला सांगून टाकतो. या राज्यात जशी मराठी पाट्या लावून काही लगेच क्रांती होणार नाही. मात्र भोंग्याचा विषय घेतल्यामुळे बघ, आपल्या पक्षात कसं नवचैतन्य आलंय. त्यामुळेच दादूच्या सरकारनं माझ्या २८ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आमचा संदीप, एवढी मेहनत करतो, त्याला इकडं तिकडं फिरावं लागत आहे. एक दिवस आपलाही येईल ना बाप्पा... मग बघ... कसा महाराष्ट्र करून दाखवतो ते...
मला काही जण विचारत आहेत की, तिकडे यूपीवाले भैय्ये माझ्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. मी भोंग्याचा विषय घेतल्यामुळं मंदिरातले भोंगे देखील काढावे लागतील आणि त्याचा ताप आपल्याला नको म्हणून कमळाबाईनं ते जाणून-बजून नाटक सुरू केलंय... पण त्यामुळे बाप्पा, तिकडे ते माझ्या विरोधात बोलतील, तर इकडे मराठी माणूस माझ्या बाजूने एकवटून येणार की नाही... कशाला कोण दादू सोबत जाईल...? आणि इथल्या यूपी, बिहारींना खळ्ळ् खट्याक काय असतं ते माहितीच आहे. योग्य वेळ आली की देईन दाखवून मी... तेव्हा तुझी कृपा अशीच राहू दे...
तुझाच - राज ठाकरे