महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हाताला हेअर लाईन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे हेअर लाईन फ्रॅक्चर झालं. दरम्यान, त्यांना झालेली दुखापत अधिक गंभीर नसल्याचंही सांगण्यात आलं. हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्या हाताला सपोर्टरही लावण्यात आलं आहे.राज ठाकरे यांचं खेळाप्रती आणि कलेप्रती असलेलं प्रेम हे सर्वांच्याच परिचयाचं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून लॉन टेनिस खेळण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी अनेकदा त्यांचे टेनिस खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राज ठाकरे यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांना यापूर्वी टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळीही त्यांच्या हाताला सपोर्टर लावण्यात आला होता. तसंच गेल्या वर्षी निवडणुकांदरम्यानही त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. याप्रकारचीच दुखापत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही झाली होती. त्यानंतर त्याला बऱ्याच कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. काय आहे टेनिस एल्बो?या व्याधीचं नाव टेनिस एल्बो असं असलं तरी ही व्याधी टेनिस खेळाडूंना होतो हा गैरसमज आहे. मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनाही ही व्याधी होऊ शकते. टेनिस एल्बो झालेल्या व्यक्तीला कोपराच्या बाहेरील बाजुला अतिशय वेदना होतात. कोपराजवळील स्नायूंच्या हालचालीमुळे ही व्याधी होती. दरम्यान, टेनिस एल्बो झालेल्या व्यक्तीला मनगटाजवळही वेदना होऊ शकतात. अनेकदा मनगट उचण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कोपराजवळ वेदना होतात. टायपिंग करणं, वस्तू पकडणं अशा गोष्टीही करणं यामुळे अशक्य होतं.
राज ठाकरेंच्या हाताला हेअर लाईन फ्रॅक्चर, टेनिस खेळताना झाली दुखापत
By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 3:03 PM
सोमवारी संध्याकाळी टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
ठळक मुद्देसोमवारी संध्याकाली टेनिस खेळताना झाली दुखापतडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावण्यात आलं.