नाशिक - राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने घेतलेल्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला हात घातला आणि न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरील भोंगे का हटवत नाही असा प्रश्न राज यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून समर्थन आणि विरोधाचे सूर उमटले आहेत. मशिदींच्या भोंग्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा प्रसारित करण्याच्या राज यांच्या आदेशाची नाशिकमध्ये अंमलबजावणी होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातच पुण्यात मात्र मनसेच्या मुस्लीम समाजाच्या नेत्याने अशाप्रकारच्या आंदोलनाविषयी नकारात्मक मत व्यक्त केले असताना नाशिकमध्ये मात्र ज्येेष्ठ माजी नगरसेवक सलीम शेख यांनी राज यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
नाशिकमधील मनसे नेते सलीम शेख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत आदेश यापूर्वीच दिले असून ज्या प्रमाणे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा निकाल मान्य केला, त्याच आदराने या निर्णयाकडे बघायला हवे. मुळातच अजान आणि भोंगे यांचा काही संबंध नाही आणि प्रार्थनेला विरोध नाही हे राज ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांची भूमिका योग्यच आहे. भोंगे लावले नसते तर, हा प्रश्नच उदभवला नसता असं सांगत शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपाने राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले. तर सत्ताधारी पक्षाने राज ठाकरे दोन समाजातील लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या भोंग्यावरील भूमिकेवर त्यांच्या मनसे पक्षातील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समोर आले. त्यानंतर मनसेचे पुणे येथील नगरसेवक वसंत मोरे यांनीही राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन न करण्याच सांगत भोंग्यावरील भूमिकेविरोधात भाष्य केले. वसंत मोरे म्हणाले की, मी साहेबांवर नाराज नाही. मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी राजकीय अडचण होते. माझ्या प्रभागातील भोंग्याविरोधात मी हनुमान चालीसा लावणार नाही. प्रभागात सलोख्याचं वातावरण राहावं अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी वैयक्तिक भावना असल्याचं उघडपणे बोलले. त्यानंतर मनसेने वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली. आता पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आली आहे.