मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली त्यावरून आता मनसेनेही राऊतांवर पलटवार केला आहे. मोदी-शाहांसोबत सत्तेत वाटेकरी असताना ते महाराष्ट्र दुश्मन नव्हते मात्र आम्ही लोकसभेला पाठिंबा दिला म्हणून दुश्मन, ज्या काँग्रेसनं संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला आणि १०६ हुताम्यांना ठार केले त्या काँग्रेससोबत जाणं महाराष्ट्र प्रेम का? असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांना विचारला आहे.
गजानन काळे म्हणाले की, चोमडे राऊत आणि त्यांचे पक्ष प्रमुख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बरोबर राज्यात आणि दिल्ली सरकारमध्ये वाटेकरी होते, त्यावेळी ते महाराष्ट्राचे दुश्मन नव्हते मात्र आम्ही पाठिंबा दिला तर दुश्मन!!! काय लॉजिक आहे ?. ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला आणि १०६ हुतात्म्यांना ठार मारले त्या काँग्रेस बरोबर जाणे म्हणजे महाराष्ट्र प्रेम का? असे अनेक दाखले देता येईल. तूर्तास मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली चरणी नतमस्तक होऊन ही अजून सिग्नल न आल्यामुळे राऊत नैराश्यात आहेत आणि त्यांचे पक्ष प्रमुख कोमात अशी टीका त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर केली आहे.
तर शिवसेना उबाठा हा पक्ष अपंगांचा पक्ष आहे. जो आयुष्यभर लोकांच्या कुबड्या घेऊन चालला. २०१४, २०१९ यांनी मोदी-शाहांची कुबडी घेतली. २०१९ नंतर यांना पवारांच्या आणि काँग्रेसच्या कुबड्या लागल्या. त्यामुळे या लोकांना चालणं काय हेच माहिती नाही. स्वत:च्या पायावर त्यांना चालता येत नाही. महाराष्ट्राच्या हिताची भूमिका आहे की नाही हे ठरवणारा संजय राऊत कोण? तुम्हाला कुणी अधिकार दिला. ज्यांनी आयुष्यभर पवारांची धुणी भांडी केली त्यांनी आमच्यावर बोलू नये. आमचे शत्रूही आम्ही महाराष्ट्रद्वेषी, मराठीद्वेषी आहोत असं बोलणार नाही. ज्या लोकांनी केम छो वरळी, जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा केले हे आम्हाला मराठी प्रेम, महाराष्ट्र प्रेम शिकवणार? जोपर्यंत तुम्ही मोदी-शाहांसोबत होतो तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र प्रेमी होता आणि आता महाराष्ट्रद्वेषी, या लोकांसारखी दुतोंडी भूमिका आम्ही कधीही घेतली नाही असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना फटकारलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
राज ठाकरे कोणत्या पक्षासोबत आहेत? ते मोदी-शाहांसोबत आहेत. जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांच्यासोबत ते कायम राहिलेत. ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष फोडला त्या पक्षासोबत एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांची गंभीरता संपली आहे. त्यांच्या काळात काय झाले हे बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही. राज ठाकरेंची दिशाच अजून स्पष्ट नाही. ते महाराष्ट्राच्या बाजूने आहेत की महाराष्टाच्याविरोधात जे आहेत त्यांच्या बाजूने आहेत? राज ठाकरेंची भूमिका नेहमी जे महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करतात त्यांना साथ देण्याचं काम ते करतात. त्यांच्यावर जास्त बोलणार नाही असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.