मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 10 रुपयात गरजूंना जेवण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर सरकार स्थापन होताच ठाकरे यांनी 'शिवभोजन' योजनेची घोषणा केली आहे. तर या 'शिवभोजन' योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विरोधकांकडून ही फसवी योजना असल्याचा आरोप केला जात आहे.
भाजपनंतर आता महराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही 'शिवभोजन' योजनेवरून सरकारवर टीका करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सराकार लोकांना 10 रुपयात थाळी देऊन उपकार करत नाही. 10 रुपयासाठी किती अटी लावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
अशा योजनामुळे 'भिक नको पण कुत्रा आवर' असे लोकं काही दिवसात म्हणतील असे म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकाराला खोचक टोला लगावला. सरकाराला देता येत नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे की, 10 रुपयात थाळी देता येणार नाही. मात्र त्यासाठी अटी-शर्ती लावून फसवणूक कशाला करता असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, 'बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि माजी आमदार राम कदम यांनी केला आहे.