मनसे, वंचित आघाडी स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:58 AM2019-06-01T02:58:38+5:302019-06-01T02:58:58+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यभर जाहीर सभा घेऊन भाजपविरोधी प्रचार करणाऱ्या मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केल्याची माहिती मनसेच्या वरिष्ठ नेत्याने दिली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. राज यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज व पवार यांच्या भेटीमुळे या चर्चेला वेग आला असताना, मनसेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे आघाडीसोबत जाण्याऐवजी आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्याप्रमाणे स्वबळावर लढण्याचा विचार करत आहेत.
आंध्रमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवून जगन रेड्डी यांनी आपली स्वतंत्र जागा तयार केली. त्याप्रमाणे, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या कारभाराचा पंचनामा करून, जनतेमध्ये जनजागृती करायची व त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अंतर ठेवून मनसेची स्वतंत्र जागा निर्माण करावी, असा राज यांचा विचार असल्याची माहिती मनसेच्या नेत्याने दिली.
‘वंचित’ काँग्रेस आघाडीसोबत नाही
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती आघाडीतर्फे देण्यात आली. वंंचित बहुजन आघाडीला राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघात लक्षणीय मते मिळाल्याने, आघाडीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडी करीत आहे.