ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि.19 - सरपंचाच्या पुतण्याला रोजगार सेवकाची ‘आॅर्डर’ का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे यांनी तालुक्यातील रेगांव येथील ग्रामसचिवास मारहाण केली. याप्रकरणी सचिव वानखेडे यांनी १९ आॅक्टोबरला दाखल केलेल्या फिर्यादीवरून अंभोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भातील फिर्यादीत नमूद आहे, की रेगांव ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवकाचे पद पाच महिण्यांपासून रिक्त आहे. या जागेवर सरपंचाचे पुतणे हिंमत माणिक थिटे यांना नेमणूक का देत नाही, असे म्हणत ‘मनसे’ जिल्हाध्यक्ष अंभोरे यांनी सचिव वानखेडे यांच्याशी वाद घातला. रोजगार सेवकाची नेमणूक ग्रामसभेमार्फत केली जाते. ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय अशी नेमणूक करता येत नाही, असे सचिव वानखेडे यांनी स्पष्ट केल्यानंतरही अंभोरे यांनी मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणणे, फोनवरून धमकी देणे आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अंभोरे यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.