नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने अनपेक्षितपणे मुसंडी मारत तब्बल ६७ जागा खिशात टाकल्या. सत्तास्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला ३४ जागांवर रोखण्यात भाजपा यशस्वी झाली. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी करूनही नाशिककरांनी मनसेला साफ नाकारले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही कशीबशी १२ संख्या गाठू शकली. अपक्षांची मात्रा चालली नाही. नाशिक महापालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला संपूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. त्यात माजी महापौर यतिन वाघ व नयना घोलप यांना पराभवाचा झटका बसला. माजी मंत्री व सेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या पराभूत झाल्या. मागील निवडणुकीत ४० जागा मिळविणाऱ्या मनसेला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. विद्यमान महापौर मनसेचे अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा व स्थायी समिती सभापती सलीम शेख यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयमाला पडली. यापूर्वी तीन जागा घेणाऱ्या माकपाच्या हाती भोपळा आला. रिंगणात उतरलेल्या ७९पैकी ४२ नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राज ठाकरेंच्या नाशकातून मनसे हद्दपार
By admin | Published: February 24, 2017 5:05 AM