Maharashtra Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. केवळ ३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा होता. यावर सगळे चिडीचूप आहेत, असे सांगत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
परतीच्या पावसाने बळीराजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऐन दिवाळीत मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती केवळ डोळे पुसण्यासारखेच ठरणार आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान हे न भरुन येणारे आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पवासाचा मोठा फटका बसल्याने दिवाळीचा सण गोड लागेना. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका शेतकरीपुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पैसे नसल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही, असं तो चिमुकला सांगतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कुटुंबीयांस सोशल मीडियातून मदतही मिळाली. यानंतर आता उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले असून, यावरून मनसेच्या गजानन काळे यांनी टीका केली आहे.
३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा, आता मात्र सगळे चिडीचूप
३० मिनिटांचा पीक नुकसान पाहणी दौरा ... आता मात्र सगळे चिडीचूप ..., असे ट्विट करत गजानन काळे यांनी अख्खी कार्यक्रम पत्रिकाच ट्विटरवर शेअर केली. तसेच शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही सडकून टीका केली. दिवाळी आली वाटले दानवे गोड बोलतील.. मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय आले दानवेना बद्घकोष्ठतेचा त्रास होवू लागला.. दिवाळीत फराळ पण खाऊ शकणार नाहीत असे दिसतेय..बरं मिलिंद नार्वेकर व पवारसाहेबांच्या बरोबर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिसले की मात्र तोंड शिवलेले असते. राहता राहिला प्रश्न उद्भव ठाकरे यांच्या दहशतीचा तर तो थापा ने केव्हाच निकाली काढला आहे.. विधानपरिषदेवर हे दानवे MIM च्या नगरसेवकांच्या जीवावर निवडून गेले आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारतात हाच विनोद आहे.. लॉटरी मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे तर वायफळ बडबड नका करू..बाकी शुभ दिपावली, असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.
दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीच मतदारसंघातील पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या बांधावर धाव घेतली. यावेळी, त्यांच्याशी संवाद साधत कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदतही देऊ केली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"