मुंबई - शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात गाजलं होतं. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. यानंतर आता संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिल्याने यावरून अनेकांनी नव्या सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय राठोड यांच्यावरून मनसेने ही खोचक टोला लगावला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एक संजयने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय... सब घोडे बारा टक्के..." असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हल्लाबोल केला आहे.
"संजय राठोड... अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात?, अब्दुल सत्तारांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का?"
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा माणसांना मंत्रिपद कसं देऊ शकतात? असं म्हटलं आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला मंत्रिपद मिळालेलं नाही. यावरूनही निशाणा साधला आहे. "एकही स्त्री मंत्रिपदासाठी योग्य नाही?" असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे. "दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी" असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी"
"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.