मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला जोर का झटका लागला आहे. कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग म्हणजेच (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही मुंबई महापालिकेच्या कारभारावरून चर्चा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचे कॅगचे विशेष ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी भाजपाकडून करण्यात आला होता. यावरून आता मनसेनेकिशोरी पेडणेकरांना खोचक टोला लगावला आहे.
“मोरूची मावशी आता लवकरच पिंजऱ्यात असेल“; असं म्हणत मनसेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर (Kishori Pednekar) जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मुंबई पालिकेची कॅग चौकशी?... अब होगा दूध का दूध और पानी का पानी... मुंबई ओरबडून खाणा-यांचे दात आता घशात जातील... मोरूची मावशी आता लवकरच पिंजऱ्यात असेल असं दिसतंय...” असं गजानन काळे यांनी आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे”
मनसेने याआधी देखील बोचरी टीका केली आहे. “मांजर लपून दूध पीत होती... महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'” असं म्हणत हल्लाबोल केला होता. “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे...मांजर लपून दूध पीत होती तर या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'” असं म्हणत गजानन काळे यांनी निशाणा साधला होता. तसेच किशोरीभव हा हॅशटॅगही वापरला होता.
मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेऱ्यात आणले जाणार आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"