माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यावरून आता मनसेने बोचरी टीका केली आहे.
“मांजर लपून दूध पीत होती... महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'” असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे...”
“मांजर लपून दूध पीत होती तर या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'” असं म्हणत गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे. तसेच किशोरीभव हा हॅशटॅगही वापरला आहे. किशोरी पेडणेकर यांनी कुणाचं अस्तित्व कुणामुळे धोक्यात येत नसतं. तुमचं अस्तित्व धोक्यात होतं असं वाटल्याने तुमच्या पक्षप्रमुखाला वेगळा पक्ष काढावा लागला. एकाबाजूला बाळासाहेब सांगतात, मी त्याचे षडयंत्र ओळखले. षडयंत्र हा शब्द बाळासाहेबांचा आहे. त्याला साथ देणारे तसेच असतात त्यामुळे त्यांना उत्तर देणे मी उचित मानत नाही. सरडा लाजेल एवढी भूमिका बदलतात अशा शब्दात मनसेवर निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकरांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. "मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन" हा शब्द देवनागरी व इंग्रजीत वाचता, बोलता, लिहिता न येणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिवाळीत पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसेचे नाव घेतल्याशिवाय फराळ गोड वाटत नाही आहे, अशी टीका गजानन काळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"