मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena Ambadas Danve) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय" असं म्हणत मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तसेच ओवेसीच्या नगरसेवकांच्या जीवावर विधान परिषदेत आमदार होऊन नंतर लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले शिल्लक सेनेचे अंबा(दास) दानवे असं म्हणत त्यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.
मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी अंबादास दानवेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "औरंगजेबाची औलाद ओवेसीच्या नगरसेवकांच्या जीवावर विधानपरिषदेत आमदार होऊन नंतर लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले शिल्लक सेनेचे अंबा(दास) दानवेंना त्यांच्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीची तळी उचलल्यामुळे त्यांचा पक्ष संपलाय याचा विसर पडलाय" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच बारामतीचा पोपट हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाचा यावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात कोर्टकचेरीपासून रस्त्यावरही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आता राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
"माझ्याकडे निशाणी, नाव असलं काय - नसलं काय; मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचाय!"
राज ठाकरे म्हणाले की, आज महापुरुषांचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जात आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तर वासरा हा विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे यावरून काही होत नसतं. विचारांचा वारसा पुढे चालवावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला त्या विचारांची पताका पेशव्यांनी अटक किल्ल्यापर्यंत फडकवली. महाराजांचा विचार पोहोचवला कुणी तर पेशव्यांनी. पेशव्यांच्या हातात संपूर्ण सत्ता होती. मात्र त्यांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणवून घेतले नाही. छत्रपती तेच आम्ही त्यांचे नोकर, असे पेशवे सांगत. माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.