मुंबई - शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यासाठी आता केवळ शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या सोबत जातील तर आमदारांना दौऱ्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मोजकेच नेते वगळता आमदारांना दौऱ्यावर जाता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे आमदार फुटण्याच्या भीतीने नेतृत्वाने सतर्कता बाळगली आहे. पुढील काही दिवस आमदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. याच दरम्यान मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे.
मनसेने अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. "रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे."अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो…आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो… विधानपरिषदेत तरी MIM व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल
"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले" असं म्हणत मनसेने हल्लाबोल केला आहे. गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. "राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले... विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.