मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतके दिवस असणारे संतोष बांगर हे देखील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. याच दरम्यान मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
"शिवबंधन, शपथा आणि आता प्रतिज्ञापत्र तरी आमदार यांच्याकडे राहीना" असं म्हणत मनसेने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हिंगोलीचे सेना आमदार संतोष बांगर ही शिंदे गटात... शिवबंधन, शपथा आणि आता तर प्रतिज्ञापत्र तरी आमदार काही यांच्याकडे राहीना... आता फक्त साखळदंड बांधण्याचा कार्यक्रमच घ्यावा लागणार आहे नवाब आणि छोटे नवाब यांना..." असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
मनसेने याआधी देखील शिवसेनेला डिवचलं आहे. "संपलेल्या पक्षात आता कोणी उरतं की नाही या भीतीने आढळराव यांच्यावरची कारवाई मागे... मंडळ चालवत आहेत की पक्ष..." असं म्हटलं होतं. तसेच "काय वेळ आली आहे ... शिल्लक सेनेच्या उरलेल्या आमदारांना बसून बैठक घ्यायला पण दालन नाही ... ये ना इंसाफी हैं जनाब ..." असंही गजानन काळे यांनी म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका केली होती.