मुंबई - शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, यावर आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यावरून मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. "काय वेळ आली आहे. मंडळ चालवत आहेत की पक्ष?" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केलं आहेत. "संपलेल्या पक्षात आता कोणी उरतं की नाही या भीतीने आढळराव यांच्यावरची कारवाई मागे... मंडळ चालवत आहेत की पक्ष..." असं म्हटलं आहे. तसेच "काय वेळ आली आहे ... शिल्लक सेनेच्या उरलेल्या आमदारांना बसून बैठक घ्यायला पण दालन नाही ... ये ना इंसाफी हैं जनाब ..." असंही गजानन काळे यांनी म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
'३ जुलै रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत,' अशी माहिती शिवसेनेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आढळराव पाटील यांनी केलं होतं ट्वीट
एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आढळराव पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं ट्वीट त्यांनी केलं होतं.