मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील मोठ्यासंख्येने जमू लागले आहेत. पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेने देखील संजय राऊतांना यावरून खोचक टोला लगावला आहे.
"महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल" असं म्हणत मनसेने राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काहीही करा पण विश्वप्रवक्ते यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापासून वंचित ठेवू नये ही "ED"ला नम्र विनंती... (आत ठेवा नाहीतर बाहेर पण त्यांना त्यासाठी विशेष परवानगी द्या) नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल" असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन" असं संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावरून आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राऊतांना खोचक टोला लगावला. "संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते" अशा शब्दांत जोरदार निशाणा साधला आहे.
"बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, राऊतांनी पवारांची शपथ घ्यायला हवी होती"
"शरद पवारांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवली" अशी बोचरी टीकाही रामदास कदमांनी केली आहे. "राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजपासोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचं रामदास कदमांनी सांगितलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.