यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी तयारी करत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दसरा मेळाव्य़ावरून पुन्हा एकदा मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केल आहे. "उद्धवजी ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो?, संपूर्ण भाषणानंतर कोणता विचार कार्यकर्ते घेऊन जात असतील?" असा खोचक सवाल मनसेने विचारला आहे. तसेच गर्दी व पक्ष फक्त पुण्याईवर असं म्हणत हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
"गर्दी व पक्ष फक्त पुण्याईवर..."
गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाबडा प्रश्न... खरच उद्धवजी ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो? संपूर्ण भाषणानंतर कोणता विचार कार्यकर्ते घेऊन जात असतील? इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर ही एका नेत्याला नीट भाषण, मुद्दे, विषय, विचार, विश्लेषण मांडता येत नसेल तर गंमत आहे. गर्दी व पक्ष फक्त पुण्याईवर..." असं काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..."
मनसेने याआधी देखील शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. "टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..." असं म्हणत खाली एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असं म्हटलं आहे. गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये "साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असं म्हटलं आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब" असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"