मुंबई - राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" असं म्हणत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे. ( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे" असं काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यामध्ये "महाराष्ट्राचं दैवत' छत्रपती शिवाजी महाराज' आणि वंदनीय' बाळासाहेब'यांची प्रतिमा व्यासपीठाखाली व चिंपाट विश्वप्रवक्ते व्यासपीठावर. यामुळेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. या कृतीतून'नवाब सेनेने' दाखवून दिले आहे की त्यांना ना बाळासाहेबांचे विचार मान्य आहेत ना छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य" असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला? याबाबत आता सदा सरवणकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावरूनही मनसेने ठाकरे सरकारला आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. "मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश संजय राऊत यांनी दिले होते असं आमदार सरवणकर यांनी म्हटलं आहे. इतरांची घरं जाळता, जाळता स्वतःचं घर कधी पेटलं कळलंच नाही" असं गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच अहो पण आता राहिलय कोण? असं म्हणत एक व्यंगचित्रही शेअर केलं होतं.