मुंबई - शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे. एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता. माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून आता मनसेने निशाणा साधला आहे.
"यांचं काही खरं नाही" म्हणत मनसेने उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गाणं ट्वीट करत टीका केली आहे. आठ सेकंदचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही, तलवारी चार नाही, यांचं काही खरं नाही" असे या गाण्याचे बोल आहे. यासोबतच त्यांनी बिन_बाणाचे_धनुष्य असा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील गजानन काळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
काही दिवसांपूर्वी "पक्षातील गळती थांबावी म्हणून छोटे नवाब आता निष्ठा यात्रा काढणार आहेत म्हणे...! खरं तर 'चमत्कार बाबा' संजय राऊत यांना कायमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं तरी यांच्या नवाब सेनेवरील विघ्न टळेल ... मात्र यांचं आपलं झालंय असं की जखम एकीकडे, मलम भलतीकडे..." असं गजानन काळे यांनी म्हटलं होतं. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरू आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीच शिवसेना संपवल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला.