मुंबई : अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात भूकंप करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे आज सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणातील सद्य परिस्थितीवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सध्याच्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली आहे.
"फोडाफोडीचं दळभद्री राजकारण राजसाहेबांना जमत नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे म्हणजे राजकारण नव्हे", अशा शब्दांत मनसेने फोडाफोडीच्या राजकारणावरून टीकास्त्र सोडले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असून शरद पवार समर्थक आणि अजितदादा समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार गटाने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत सुनिल तटकरे यांच्याकडे पदभार सोपवला आहे. तर शरद पवार गटाने अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची टीका केली होती. पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेताच भाजपवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजप बरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत. मुंबईसह विविध भागात 'राज आणि उद्धव' यांनी एकत्र यावे असे पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकावले आहेत.