मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाचा जुन्या झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. यानंतर मनसेची सत्ता असलेल्या एकमेव खेड नगरपरिषदेवर राजमुद्रा असलेला पक्षाचा नवा झेंडा फडकविण्यात आला. मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांसह खेड नगरपरिषदेवर नवा झेंडा फडकवत जल्लोष साजरा केला.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.
मनसेने नवीन भगव्या असणाऱ्या झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा ही आमची टॅगलाइन आहे त्यातून सगळं स्पष्ट आहे. काही लोकांनी राजमुद्रेवरुन वाद निर्माण केला असेल त्यांना विनंती आहे की, छत्रपतींना जसं तुम्ही आदर्श मानता तसं आम्हीदेखील शिवरायांना आदर्श मानणारे आहोत. शिवरायांनी जसं लोककल्याणकारी राज्य निर्माण केले तोच विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केले होते.
छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक
मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही. असे म्हणत राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन'' असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.