Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. यातच मनसेने अप्रत्यक्षरित्या संभाजी भिडे यांच्यावर टीका केली असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांची एक जुनी पोस्ट पुन्हा एकदा शेअर केली आहे.
संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. यातच आता मनसेने पोस्ट शेअर करत संभाजी भिडेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे नेमके काय म्हणालेत पोस्टमध्ये?
महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ही पोस्ट २ ऑक्टोबर २०२२ ला रोजी केली होती. राजसाहेब ठाकरेंनी २ ऑक्टोबर २०२२ ला 'महात्मा गांधीं'वर लिहिलेली एक अप्रतिम अभिवादनपर पोस्ट, असे मनसेने हीच पोस्ट पुन्हा शेअर करताना म्हटले आहे.