मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना फोनवर चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या तब्येतीची एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली होती. मात्र सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील फोन वरील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. कारण, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळणार का, याची चर्चा आता रंगली आहे. यावरून शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली, असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत. आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही. त्यामुळे राजकीय सल्ले घेताना हिशेब बघून घ्या. मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन आहे", अशा आशयाचे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांच्या ट्विटची सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सध्या राज्यात घडणाऱ्या या घडामोडींवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. याआधीही दीपाली सय्यद ट्विट करत म्हणाल्या होत्या की, एकनाथ शिंदे भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे. उगाच भाजपाच्या IT Cell च्या लिंबू टिंबुनी सोशल मीडियावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.
सत्तानाट्यात राज ठाकरेंची एन्ट्री?एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात नुकतेच फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेळ पडल्यास आपला गट मनसेत विलीन करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी आपल्या'शिवतीर्थ' या निवासस्थानी मनसेच्या मोजक्या नेत्यांशी चर्चाही केली होती. या बैठकीत नक्की काय ठरले, हे माहिती नाही. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता या सत्तानाट्यात राज ठाकरे यांची एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.