मुंबई - जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाला हे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी राजकारण करू नये असं मोठं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील मनसेचा २३ वर्षीय कार्यकर्ता ज्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं दाखवले होते, मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये जयचा मृत्यू गंभीर मारहाण आणि दुखापतीमुळे झाल्याचं समोर आले. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी चित्र आहे. जयच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आणि जयच्या मृत्यूची चौकशी या दोन्ही मागण्या सरकारने मंजूर केल्या पाहिजेत. याबाबत कुटुंबाने रितसर तक्रार पोलीस ठाण्यात द्यावी. मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा अशी आमची मागणी आहे. आम्हाला दोषी ठरवून जे काही गुन्हे असतील ते घेण्याची आमची तयारी आहे. परंतु यात जे कुणी दोषी असतील मग आम्ही असो वा त्यांच्यातील कुणी या प्रकरणी राजकारण करू नये. अमोल मिटकरी जर दोषी असेल तर त्याला भरचौकात फासावर द्या असं त्यांनी म्हटलं.
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
तसेच जे कुणी आरोपी असतील. जय त्याठिकाणी आंदोलनात होते, तिथे त्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न झाला. पूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघा, त्या विद्यार्थ्याने आमच्या वाहनावर हल्ला केला नव्हता. तो मागे उभा होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या शेवटपर्यंत काय काय झाले हे सत्य कुटुंबासमोर आले पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाले पाहिजे. जय मालोकर कुटुंबाने जी मागणी केली ती रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे अशी मागणीही आमदार अमोल मिटकरींनी केली.
दरम्यान, मला यात राजकारण करायचं नाही. जय मालोकर हा विद्यार्थी होता. आमच्या वाहनावर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नव्हता. पण कुणीतरी बैठकीत आले, आंदोलनानंतर जय नेमका कुणासोबत होता, कुठे कुठे त्याला नेले गेले या सर्व गोष्टीच्या चौकशीची मागणी कुटुंब करत असेल तर ती मागणी रास्त आहे. आम्हाला या प्रकरणी पक्षीय राजकारण करायचे नाही. जयला कुणी मारलं हे जनतेसमोर सत्य येऊ द्या. सर्वांचे कॉल डिटेल्स काढा. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, जय मालोकरच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे असं अमोल मिटकरींनी मागणी केली.