मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचं रविवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. मनीषा नगर येथील नागरिकांसाठी "शिवभोजन" योजनेचे उदघाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन केल्यानंतर शिवथाळीचा आस्वाद घेत असतानाचा आव्हाड यांचा एक फोटो व्हायरल झाला असून, यावरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनीषा नगर येथील नागरिकांसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन केल्यानंतर आव्हाड यांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला. मात्र शिवथाळीचा आस्वाद घेताना आव्हाड यांनी पाणी पिण्यासाठी बिस्लेरी बाटली सोबत घेतली होती. त्यांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तर यावरून मनसे नेते अमय खोपकर यांनी ट्वीट करत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. “10 रुपयाच्या थाळीसोबत20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस” असा खोचक टोला खोपकर यांनी यावेळी लगावला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गोरगरिबांसाठी 10 रुपयात भोजन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तर सत्तास्थापन होताच ह्या योजनेची सरकारने घोषणा केली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेचं उद्घाटन करण्यात आले. विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते केंद्रांचे उद्धाटन करत शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली.