ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन अजित पवार यांची भेट घेतली. नांदगावकर यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-विर्तक सुरु झाले आहेत.
बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाल्यानंतर वसंत गीते, प्रवीण दरेकर या नेत्यांनी मनसेला 'रामराम' करत भाजपमध्ये प्रवेश केला. हे नेते सुद्धा राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते.
घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली अशी चर्चा आहे. नांदगावकर यांची ही भेट राजकीय कारणासाठी असेल तर, राज ठाकरे यांच्यासाठी तो आणखी एक धक्का ठरु शकतो.