Maharashtra Political Crisis: देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थिती वाईट झाली आहे. त्यांच्याकडे नेतेच काय, हाडाचे कार्यकर्तेही राहिले नाहीत. त्याच मार्गावर आता राष्ट्रवादी जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नेमक्या याच गोष्टीची सल नेत्यांनी बोलून दाखविली. कार्यकर्ते नसतील, तर कोणाच्या जिवावर निवडणुका जिंकायच्या, हा प्रश्न त्यांना छळायला लागला आहे. कारण, घोडामैदानही लांब राहिलेले नाही. यावरून मनसेनेराष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीत पक्षासाठी खस्ता खाणारे कमी झाले आहेत. संघटनात्मक बांधणीची कामे करायला कोणी तयार नाही. जे आहेत ते मोजके. बहुतेकांना मिरवून घेण्यात रस अधिक. जळगावपेक्षा मुंबईच्या वाऱ्या करून नेत्यांसोबत फोटो काढून घेण्याची हौस दांडगी आहे. नेतेही अशांना विचारत नाहीत, जिल्ह्यात तुम्ही पक्ष किती उभा केला? कहर म्हणजे कामांपेक्षा प्रसिद्धीचा सोस एवढा वाढला आहे, की स्थानिक पातळीवरील बातम्यांमध्ये नावे येत नाहीत म्हणून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या जात आहेत. हाच धागा पकडत मनसे नेते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा
काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला लिहिलेले पत्र राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची मोहीम पक्षाकडून हाती घेण्यात आली होती. यावेळी राज्यभरात पत्र पोहोचवण्यासाठी मनसेकडे कार्यकर्ते तेवढे आहेत का, अशी खोचक टीका करण्यात आली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. गजानन काळे यांनी एका वाक्यात राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा, असे ट्विट काळे यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे; पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावागावांत संघटन राहिलेले नाही, हे कोणी नाकारू शकणार नाही. भाजपमधून आलेल्या आमदार एकनाथ खडसेंनी संघटन बांधणी कशा पद्धतीने केली पाहिजे, याचे धडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आचरणात किती जण आणतील ? याचे उत्तर येत्या काही दिवसांत दिसेल. पक्ष टिकवायचा असेल, तर कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. आजची पिढी उद्या बाजूला झाल्यावर त्यांची जागा घेणारा दुसरा लागेल. संधी मिळते; मात्र ती घेणारा असला पाहिजे. अन्यथा ‘राष्ट्रवादी’ आणि ‘काँग्रेस’ दोघेही एकाच रांगेतील पक्ष होतील.