मुंबई - राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. मिटकरींच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर मिटकरी सातत्याने राज ठाकरे आणि मनसेवर निशाणा साधत आहेत. त्यातच मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर दुनबळे यांनी आमदार अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मनसे नेते कर्णबाळा दुनबळे म्हणाले की, आज राज ठाकरेंची भेट घेतली. अकोल्यात जो काही प्रकार झाला तो महाराष्ट्र सैनिकांचा उद्रेक होता. त्याबाबत राजसाहेबांशी सविस्तर चर्चा झाली. मात्र त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय आमच्या जयचा होता. अमोल मिटकरींसारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाही, मिटकरींची तेवढी औकात नाही. आमचा जयबद्दल साहेबांना अतीव दु:ख झालं. हा घातपात आहे की अन्य काही यावर चर्चा झाली. साहेबांनी काही निर्देश दिलेत त्यावर आम्ही काम करू असं त्यांनी सांगितले.
तसेच मिटकरींच्या तोंडालाच मूळव्याध झालाय, त्याला काय बरळायचं ते बरळू द्या. जयच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी अमित ठाकरे अकोल्यात पोहचलेत. मीदेखील काही तासात तिथे पोहचेन, माझ्यावर गुन्हा दाखल झालाय, ३ जणांना ताब्यात घेतलं त्यांना जामीन मिळाला आहे. आज ८ जण पोलिसांकडे शरण गेलेत. मीदेखील तिथे हजर राहणार आहे. मी पोलीस स्टेशनला जाईन, आज नाहीतर उद्या आम्हाला जामीन मिळेल असंही मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटलं.
दरम्यान, अजितदादांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी अमोल मिटकरींनी घेतलीय, त्यामुळे अजित पवारांनी काळजी घेतली पाहिजे. मिटकरींना पोलीस सुरक्षा वाढवून घ्यायची आहे. स्वत:चं वलय वाढवण्यासाठी मिटकरी हे प्रकार करतायेत. आजच्या बैठकीत जयबद्दलच आमची चर्चा झाली, राजसाहेब अतिशय हळवे आहेत. जयच्या मृत्यूनं मनसेला दु:ख झालं आहे. त्यामुळे आज मनविसे वर्धापन दिन असूनही एकही कार्यक्रम झाला नाही. मनसे हे कुटुंब आहे. आम्ही जयच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत असं कर्णबाळा दुनबळे यांनी सांगितले.