छत्रपती संभाजीनगर - मालवणमध्ये जी दुर्देवी घटना घडली, ८ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे म्हणजे यात हलगर्जी निश्चित झाली आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांची भ्रष्ट युती त्यातून झालेला हा दुर्दैवी प्रकार आहे. शिवकालीन पत्राचा हवाला देत आज टोपीकर ही उपमा अधिकारी कंत्राटदारांना लागू होते. डोळ्यातून काजल जसं चोरून नेतात तसं भ्रष्टाचार करून आपला फायदा करून घेतात अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, फार वर्षापूर्वी एका वृत्तपत्रात शिवकालीन पत्र छापलं होते ते माझ्या वाचण्यात आले. मी मालवणमधील घटनेपासून अस्वस्थ होतो. मी दुर्ग अभ्यासक प्रा. घाणेकर यांच्याशी संपर्क केला त्यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकात पत्राचा उल्लेख केला होता. माझे सांगलीचे मित्र प्रविण भोसले यांचाही शिवकालीन इतिहासावर अभ्यास आहे. प्रत्येक गोष्टीला ते पुरावे शोधतात. त्यांचे एक पुस्तक आहे सिंधुदुर्ग शिवलंका नावाचं, त्यात प्रकाशित झालेला हा उतारा आहे. पत्रातील भाषा आणि त्यावेळी महाराज किती जागरुक होते हे दिसून येते. अष्टावधानी आमचा राजा, दुर्दैवाने त्यांचाच पुतळा त्यांनी बांधलेल्या किल्ल्यासमोर पडावा, जो किल्ला ३५० वर्ष झाली समुद्राच्या प्रत्येक वातावरणाला तोंड देत आजही ताठमानेने उभा आहे त्याचे कारण म्हणजे आपण एखादं काम करताना निस्वार्थपणे केले पाहिजे, त्या कामाचं आपल्याला महत्त्व असले पाहिजे. लोक पैसा कमवण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी पाहतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराजांनी लिहिलेल्या पत्रात काही वाक्ये खूप चांगली आहेत असं सांगत प्रकाश महाजनांनी ते पत्र वाचून दाखवले. त्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावलेले बरे जाणणे, पायात ओतण्यापायी शिसे धाडावयची व्यवस्था केली असे, नीट पाहूनी मोजूनी माल ताब्यात घेणे, टोपीकर सावकर लबाड जात, डोळ्यातील काजल चोरून नेतील पत्ता लागू देणार नाही. सिंधुदुर्ग समुद्र खारो पाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराज असं पुढे लिहितात, गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या टाक्या बांधूनी त्यात वाळू साठवणे, गोड्या पाण्यात चार दोनदा भिजू देणे, खारटान धुतले जाईल, चुनखडी पाठवित आहे, ती तपासून घेणे" इतकं बारीक लक्ष महाराजांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मालवण किल्ला बांधायला घेतला तेव्हा राजकारणाचा भाग म्हणून त्यांना आग्राला जावं लागतं, त्यानंतर पुढे त्यांची आग्र्यातून सुटका वैगेरे या कालखंडातही मालवण किल्ल्याचं काम सुरू होते. त्यांनी कसं काम करावं, काय नाही याची पूर्ण सूचना शिवाजी महाराजांनी तिथल्या लोकांना दिली होती असं मनसे नेते प्रकाश महाजनांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी हे पत्र वाचून दाखवलं.
दरम्यान, आज दुर्देवाने आम्ही कुठलाही प्रयत्न केला नाही की महाराजांचे स्मारक भव्य आणि टिकाऊ राहावे. ८ महिन्यात पुतळा पडतो. बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रात पुतळा उभा केला नाही. आज जर तो पडला असता तर जगभर आपली नाचक्की झाली असती. आज जगात पाचवी सत्ता म्हणून मिरवत आहोत त्याचं हसं झालं असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ज्या बाबतीत घ्यायला पाहिजे तो घेतला नाही म्हणून गेली १५ वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. दर गणपतीला मुख्यमंत्री पाहणी करतात पण अजून झाले नाही असं सांगत प्रकाश महाजनांनी सत्ताधाऱ्यांच्या कामावर टीकास्त्र सोडलं.