ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. दरेकर यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची भेट घेतली असून येत्या काही दिवसांत त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल असे सांगितले जाते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दरेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास मनसेला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली असून यंदा पक्षाचा फक्त एक आमदार विधानसभेत पोहोचला आहे. पक्षाच्या या कामगिरीमुळे पक्षाची मान्यताच धोक्यात आली आहे. यंदा पक्षाचे धोरण चुकले असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले असले तरी मनसेचे धोरण नव्हे तर आमदार कमी पडले अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली होती. यामुळे नाराज झालेले प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या धोरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे पराभव झाला असे दरेकर यांचे मत होते. दरेकर यांनी राज ठाकरे यांची तुलना थेट राहुल गांधीशी केली. प्रत्येक पराभवानंतरही काँग्रेसमध्ये राहुल गांधींची पाठराखण करणे सुरुच होते. मनसेतही राज ठाकरेंच्या निर्णयपद्धती आणि कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी आहे. मात्र आता पराभवासाठी आमदार आणि पदाधिका-यांना जबाबदार धरण्यात येत आहे अशी भावनाही दरेकर यांनी राजीनामा देताना व्यक्त केली.
राजीनामा दिल्यावर प्रवीण दरेकर भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरेकर येत्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये जातील असे यात म्हटले आहे. मात्र मनसेच्या एका नेत्याने दरेकर यांच्या भाजपाप्रवेशाचे कारण वेगळेच असल्याचे म्हटले आहे. दरेकर गेल्या २० वर्षांपासून राज ठाकरेंसोबत आहे. पण आता मुंबै बँकेतील घोटाळ्यामुळे ते मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये जात असावेत असे सूचक विधान या नेत्याने केले आहे. माजी आमदार प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक असून या बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.