मुंबई : राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिनहीही असततो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यांना टोला लगावला असून, कामगारांसंदर्भातही सरकारला प्रश्न विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी 'मनसे अधिकृत' या आपल्या ट्विटर अकाउंटवर काही ट्विट करत परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.
देशात महाराष्ट्राचे महत्त्व कमी केल्याचा ठपका राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यावर ठेवला आहे. यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये राज म्हणता, 'जवळपास सव्वाशे वर्ष मराठ्यांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायची पण आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन झालेत', असा टोला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे.
हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल
कामगार दिनानिमित्त आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउन संदर्भातही राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. यात, "कोरोना टाळेबंदीमुळे देशात-राज्यात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्या सर्वांचा विचार सरकार करणार का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.