Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप, शिंदे गटासह मनसेकडूनहीमहाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींकडून वारंवार होत असलेल्या अपमानाबाबत शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाली असून, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यातच आता आणीबाणी इतिहासातील चूक होती हे मविआ मान्य करेल का, अशी विचारणा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ???? अशी विचारणा केली आहे.
राहुल गांधींवरील कारवाईवरून काँग्रेसची जोरदार निदर्शने
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. तसेच राज्याच्या विधिमंडळात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठाकरे गटही सामील झाला होता. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा धिक्कार केला, त्यांच्यासोबत ते गेले. यानंतर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे, असे चॅलेंज देत, राज्याच्या विधानसभेत सावरकरांच्या अपमानाबाबत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात चकार शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी जी कायद्याने गेली, त्याचा निषेध करायला काळ्या फिती लावून यांच्या बरोबर जाऊन उभे राहिले. मूग गिळून गप्प राहिले. उलट त्यांचे चिरंजीव म्हणाले की, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. भूमिका वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच हे तुम्ही ठरवून करताय. चारही बाजूंनी भडिमार झाल्यामुळेच सावरकरांचा अपमान सहन न करण्याची बतावणी करण्यात आली, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"