मुंबई - आम्हाला जे सुपारीबाज म्हणतात, त्यांच्यासारखं आम्हाला तोंड लपवून दिल्लीला जायची वेळ आली नाही. जी भूमिका घेतली ती उघड घेतली. राज ठाकरे, अमित ठाकरे दिल्लीला समोरासमोर गेले. तुमच्यासारखे मास्क लावून, वेशांतर करून जायची गरज पडली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तोंड लपवून कुणाला फिरायची गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींनाही समजलं पाहिजे असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
अकोला इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर मनसे-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे म्हणाले की, नॅरेटिव्ह कुणीही सेट करतं, आम्ही जी भूमिका घेतली ती लोकांसमोर घेतली. सुपारीबाज कोण तर ज्यांनी २०१९ ला भाजपासोबत गळ्यात गळे घालून निवडणूक लढवली आणि निकालानंतर पवारांच्या मांडीवर बसले हे सुपारीबाज नाहीत का? जे शरद पवार शिवसेनेविरोधात लढले, ज्यांनी शिवसैनिकांना कुत्र्यांची उपमा दिली त्यानंतरही उद्धव ठाकरे शरद पवार गळ्यात गळे घालून फिरतायेत ते सुपारीबाज नाहीत का?. दुसऱ्यांना सुपारीबाज म्हणण्यापूर्वी तुम्ही किती वेळा भूमिका बदलली? असा सवाल करत मनसेनं आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
तसेच इथल्या मारवाडी कंत्राटदारांची सुपारी आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. याच कंत्राटदारांसोबत तुम्ही महापालिकेत ५ वर्ष घालवली. ज्या इक्बाल चहल यांना तुम्ही आज नावं ठेवताय त्यांनाच हाताशी धरून तुम्ही कोविड काळात भ्रष्टाचार केलात ना, आम्ही जनतेची सुपारी घेऊ, विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवण्याची सुपारी घेऊ, आदित्य ठाकरे वरळी सोडून सर्व मुद्द्यांवर बोलतात, साडेचार वर्ष ते वरळीत फिरकलेच नाहीत असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, स्वत:ची लायकी नसताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केली. ती क्रिया होती त्यावर तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी प्रतिक्रिया दिली. आमचे लोक झाडू घेऊन मारायला गेले होते. तो मुर्ख माणूस आहे त्यांच्यावर फारसं लक्ष द्यायला नको. जो काही हल्ला झाला तो सांगून नाही तर उत्स्फुर्त झाला असं सांगत संदीप देशपांडेंनी मिटकरींवर घणाघात केला.