मुंबई - आदित्य ठाकरेंवरील आरोपावर पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले पण राज ठाकरेंवर टीका केली होती. आता मनसेनेउद्धव ठाकरेंवर पलटवार करत आता आदित्य ठाकरेंबाबत जी काही एसआयटी चौकशी लावली आहे ती विरोधकांनी लावलीय, परंतु राज ठाकरेंच्या वेळी त्यांना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीयच होते असा निशाणा साधला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून उद्धव ठाकरे सेटलमेंट करतायेत. टीका केली म्हणून झोंबण्याचे कारण काय? आम्ही जे आंदोलन केले त्याचा निकाल आला. मराठी पाट्या आंदोलन झाले, ज्या लोकांनी टोलनाके बंद करू असं आश्वासन दिले पण सत्तेत आल्यावर काय केले? ऑक्सिजनचा कुठलाही संबंध नसताना हायवे कंपनीला कंत्राट कसे मिळाले. बीएमसीमध्ये सत्तेत असताना रस्ते कंत्राटासाठी ६ कंपन्या सोडून सातवी कंपनी का आली नाही. मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा यांनी प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी चमचेगिरी करण्याची सवय आहे. २०१९ पूर्वी नरेंद्र मोदींची केली तर २०१९ नंतर शरद पवारांची चमचेगिरी केली. त्यामुळे चमचेगिरी करण्याचं कौशल्य हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे आहे अशी टीका त्यांनी केली.
तसेच ज्यांच्या मानेला आणि मनाला पट्टा बांधलाय त्यांना शालीचे वजन आणि विचारही पेलणार नाहीत.त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल न बोललेलं बरे.आतापर्यंत या लोकांनी जी आंदोलन केली.याआधी रिलायन्सच्या इलेक्ट्रिक दरवाढीविरोधात आंदोलन केले त्याचे पुढे काय झाले? यूएलसीबद्दल आंदोलन केले त्यानंतर कुठल्या बिल्डरसोबत सेटलमेंट झाल्यावर आंदोलन मागे घेतले? नाणार प्रकल्पासाठी आंदोलन केले. मग बारसूला रिफायनरी प्रकल्प करावा यासाठी पत्र लिहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणासोबत सेटलमेंट केली? ज्यावेळी अंबानी समुहाला सौदी अरेबिया कंपनीचे शेअर्स मिळाले त्यानंतर तुम्ही बारसूसाठी पत्र लिहिले.मग तेव्हा कुठली सेटलमेंट केली. त्यामुळे कोण कोणाचे चमचे आहेत हे जगाला माहिती आहे. अदानींच्या सांगण्यानेच आंदोलन करताय का असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सामान्य माणसांच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसत नाही. कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांचे हाल झालेत. अवकाळी पावसानं शेतीचे नुकसान झाले आहे. शहरात गेली २ वर्ष लोकप्रतिनिधी नाही. महापालिकेच्या तिजोरीचा पैसा सगळे अधिकारी लुटून खातायेत त्याकडे कुणी लक्ष देत नाही. कोण कोणाच्या लग्नात गेले, कुणी कुठे डान्स केला यापेक्षा लोकांच्या प्रश्नावर लक्ष दिले पाहिजे असं मनसे नेते देशपांडे म्हणाले.