मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरातून शिवसैनिक आणि सेना नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीवरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
'मुलाखत म्हणजे WWEची मॅच'संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल(26 जुलै) रोजी प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग आज(27) जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर गंभीर आरोप केले. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ''कालच्या भागासारखाच हा भाग होता, वेगळं काहीच वाटलं नाही. जशी WWF ची मॅच असते, मारामारी होते पण लागत कुणालाच नाही, तशी ही मुलाखत होती,'' असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.
'बाळासाहेब एक विचार'देशपांडे पुढे म्हणतात, ''काल उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुणीही घेऊ नका. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे आहेत. हिंदू महासभा, काँग्रेस किंवा प्रकाश आंबेडकर कधी म्हणाले का? की तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. ती आमची संपत्ती आहे, मूळात ही लोकं म्हणजे विचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा नसतो,'' असंही देशपांडे म्हणाले.
'आमचे नगरसेवक फोडले तेव्हा...'देशपांडे पुढे म्हणतात की, ''निरोगी राजकारण म्हणजे नेमकं काय? ते मला कळलं नाही. दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, दुसऱ्यांच्या मागे क्राइम ब्रँच लावायची, याला ते निरोगी राजकारण म्हणतात का? आपण कुठल्या पद्धतीचे राजकारण केले? पैसे देऊन, फूस लावून लोकांचे नगरसेवक फोडले, अशाप्रकारचे निरोगी राजकारण त्यांना अपेक्षित आहे का?'' असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.