“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:37 PM2021-06-08T22:37:34+5:302021-06-08T22:38:50+5:30
मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीनंतर मनसे नेत्याचा टोला.
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. राज्यातील विविध विषयांवर त्यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. या भेटीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
"आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको," असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यातून यावर निशाणा साधला.
आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2021
मराठा आरक्षणावरही चर्चा
महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरलं जात होतं. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची दिल्लीत भेट घेतली. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 'पंतप्रधानांसोबतची भेट औपचारिक स्वरुपाची होती. त्यात मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. मोदींनी संपूर्ण विषय गांभीर्यानं ऐकला. आम्ही याबद्दल त्यांना विस्तृत पत्रं दिली. ते निश्चितपणे हा प्रश्न सोडवतील,' अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल मोदींसोबत चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षण न्यायालयानं रद्द केलं आहे. हा देशपातळीवरील विषय आहे. याशिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा विषयदेखील संवेदनशील आहे. याबद्दलदेखील मोदींसोबत चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा, थकलेला जीएसटी, शेतकऱ्यांचं पीक कर्ज, त्यांच्या अटींचं सुलभीकरण याबद्दलही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.