मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. राज्यातील विविध विषयांवर त्यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. या भेटीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टोला लगावला आहे. "आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको," असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यातून यावर निशाणा साधला.
“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 10:37 PM
मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीनंतर मनसे नेत्याचा टोला.
ठळक मुद्देमुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीनंतर मनसे नेत्याचा टोला.