मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा केला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप (BJP), मनसे (MNS), रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. पोलिसांना १०० कोटींचे टार्गेट दिले होते, तर मग मुंबई महापालिकेला कितीचं टार्गेट दिलं असेल, असा रोकडा सवाल देशपांडे यांनी केला आहे. (mns leader sandeep deshpande slams thackeray govt over param bir singh letter bomb)
मुंबई पोलिसांना १०० कोटीचं टार्गेट असेल, तर महापालिकेला कितीच असेल, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे. ते पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, हीच ती वेळ विरप्पनगॅंगला कायमच क्वारंटीन करण्याची.
महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा
परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.
"महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा"
उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा अधिकार नाही
रामदास आठवले यांनी ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंग प्रकरणावर आपले मत मांडले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.